
मुंबई : गुरुवारी (२ जानेवारी) आघाडीच्या बैठकीदरम्यान खातेवाटपावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यात खडाजंगी उडाली असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये झळकत आहेत. यावर आता स्वतः अजित पवार यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि माझ्यात वाद झाल्याची बातमी धादांत खोटी असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.अजित पवार म्हणाले, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि माझ्यात वाद झाल्याची बातमी मुळात खोटी आहे. मी त्या वृत्तपत्राच्या संपादकांशी बोललो. त्यांच्या इतर सहकाऱ्यांशीही बोललो. तुम्ही माझ्या बोलल्यानंतर अशोक चव्हाण यांच्याशी बोला. अशोक चव्हाण यांच्याशी माझे खूप चांगले संबंध आहेत. एकेकाळी ते मुख्यमंत्री असताना मी त्यांचा सहकारी म्हणून काम केलं आहे. ज्या पत्रकाराने बातमी दिली त्या पत्रकारांनी अद्याप फोन उचलला नाही. मी त्यांनाही विचारणार आहे. त्यांच्याकडे जर दुसऱ्या बातम्या देण्यासाठी नसतील तर ठिक आहे. पण इतक्या धादांत खोट्या बातम्या दिल्यास त्यांची विश्वासहार्यता कमी होईल. असंही अजित पवार यांनी नमूद केलंंअजित पवार यांनी पुरातनवर झालेल्या खातेवाटपाच्या बैठकीबाबतही माहिती दिली. ते म्हणाले, एकतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही बैठकीला नव्हते. गुरुवारी (2 जानेवारी) पुरातनच्या बैठकीत मी, जयंत पाटील, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत आणि शिवसेनेचे सुभाष देसाई, एकनाथ शिंदे हजर होते. सर्व माध्यमं बाहेर होती. आमचा चेहरा पाहून कुणाला तरी असं वाटले का आमचं भांडण झालं. यात भांडायचं वाद घालायचं कारण काय? राष्ट्रवादीला जी खाती मिळाली ती मिळालीच आहेत. अजून एक महत्त्वाचं खातं राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार होतं, ते विस्तारवाढीला देण्याचं ठरलं होतं. आता काँग्रेसच्या खातेवाटपाचा निर्णय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी सांगतील त्याप्रमाणे होईल आणि शिवसेनेबाबत स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असल्याने तेच यावर निर्णय घेतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली
0 Comments