आंबेडकर चौक बसथांब्यावर बसण्याची सोय नसल्याने प्रवाशांचे हाल;संबंधितांचे दुर्लक्ष

डॉ.आंबेडकर चौक बसथांब्यावर बसण्याची सोय नाही; प्रवाशांचे हाल, प्रशासनाचे दुर्लक्ष

भोकर (प्रतिनिधी) –
शहराच्या मध्यभागी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक बसथांब्यावर प्रवाशांना बसण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने दररोज शेकडो नागरिकांना उभ्याच प्रवासाची वाट पाहावी लागत आहे. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात प्रखर ऊन यामुळे प्रवाशांची परवड होते आहे.

दररोज गावोगावी जाण्यासाठी शेकडो प्रवासी या ठिकाणी थांबतात. मात्र बसथांब्यावर ना बाके आहेत, ना शेडची सोय. परिणामी वृद्ध व महिला प्रवाशांना जमिनीवर बसावे लागते, तर मुलांना रस्त्याच्या कडेला उभे राहावे लागते. या असुविधेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

नागरिकांनी अनेकदा बसथांब्यावर बसण्याची व सावलीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली, परंतु संबंधित प्रशासनाने त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.

*बस थांबा गेला कुठे?*

काही वर्षांपूर्वी आंबेडकर चौक येथे प्रवाशांना ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण मिळावे म्हणून नगरपरिषदेच्या वतीने आधुनिक बस थांबा बसवण्यात आला होता. मात्र हा बस थांबा अचानक का काढण्यात आला, याचे उत्तर कोणी देत नाही. काढलेला सांगाडा नेमका कुठे गेला, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

या बस थांब्यामुळे पूर्वी प्रवाशांना थोडाफार आराम मिळायचा. मात्र आज ना बसण्याची व्यवस्था आहे, ना शौचालयाची. तरीही भोकर आगाराकडून या ठिकाणाला बसथांबा म्हणूनच मान्यता देण्यात आली आहे, हे प्रशासनाच्या कामकाजातील विसंगतीचे उदाहरण मानले जात आहे.

Post a Comment

0 Comments