
बीड : राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी आज होणारी निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. राज्यातील भाजपाची सत्ता गेली तशी जिल्हा परिषदेतील भाजपाच्या काही सदस्यांनी पंकजा मुंडेंची साथ सोडून धनंजय मुंडेंना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. या सदस्यांवर धनंजय मुंडेंनी सत्तेच आमिष दिले आहे. शिवसेना, कॉंग्रेसही राष्ट्रवादीसोबत गेली असून राष्ट्रवादीचे संख्याबळ ३० च्या पुढे सरकले आहे. भाजपला मदत करणारे शिवसंग्रामचे सदस्यही राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांना धक्का देत धनंजय मुंडे ज़िल्हापरिषदेचीही सत्ता आपल्या हाती घेणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
जिल्हा परिषदेमध्ये सध्या भाजपची सत्ता असली तरी संख्याबळाचा विचार करता यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार आहे. मागील वेळी निवडणुकीत कमी जागा मिळूनही राज्यातील सत्ता, मंत्रिपदाच्या जोरावर पंकजा मुंडे यांचे डावपेच यशस्वी ठरले आणि जिल्हा परिषदेत भाजपला सत्ता मिळाली. परंतु जशी भाजपाची खेळी सत्तेमुळे यशस्वी झाली; तसेच आता राष्ट्रवादीनेही सत्तेचा महिमा अगाध असतो हे दाखविण्याची तयारी सुरू केली आहे.सदस्यांच्या बीड जिल्हा परिषदेत पाच सदस्यांना मतांचा अधिकार नाही, तर संदीप क्षीरसागर व बाळासाहेब आजबे विधानसभेला विजयी झाल्याने या दोन जागा रिक्त आहेत. त्यामुळे ५३ सदस्यांतून अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड होणार असल्याने २७ सदस्यांची साथ असलेल्या पक्षाकडे पदे येणार आहेत. राष्ट्रवादीने हा आकडा ३० च्या पुढे नेल्याची माहिती आहे.
शिवसेनेचे चार सदस्य आहेत. आगामी काळात भाजपसोबत युती नसल्याने त्यांनीही राष्ट्रवादीसोबत जावे, असा वरिष्ठ पातळीवर निर्णय असल्याची माहिती शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी सभापती युद्धाजित पंडित यांना दिली. तर मागच्या वेळी भाजपसोबत असलेल्या कॉंग्रेसचे राजेसाहेब देशमुख यांनाही वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीसोबतच जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे पाच सदस्य वाढले आहेत.
दरम्यान, शनिवारी होणाऱ्या निवडीसाठी दोन्ही बाजूंनी सदस्यांची जमवाजमव केली आहे. भाजपने दहा दिवसांपूर्वीच सदस्यांना सहलीवर पाठविले होते. आता अध्यक्षपदाबाबत खल सुरू आहे. तर शेवटच्या टप्प्यात तयारी करणाऱ्या राष्ट्रवादीचे सदस्य सध्या औरंगाबादेत आहेत. मंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार बाळासाहेब आजबे, अमरसिंह पंडित, बजरंग सोनवणे आदी नेते इथे आहेत.
राज्यातील सत्ता परिवर्तन आणि परळी मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव केल्यामुळे आत्मविश्वास दुणावलेले मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा बहिणीला दे धक्का देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना चकवा देत जिल्हा परिषद भाजपकडे खेचून आणण्यात बाजी मारली होती. मात्र, यावेळी काय चमत्कार होणार याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
0 Comments